तमिळनाडूच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व नाट्य पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील सुपरस्टार विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत ‘सर्वात मोठा पक्ष’ होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक आकडा नसल्याने राज्यपालांनी सत्तास्थापनेचा पेच वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली असून, त्यांनी थलापती विजय यांच्या समर्थनात मोठी मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचे ऐतिहासिक दाखले प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “टीव्हीकेकडे बहुमत नाही, केवळ या शंकेवरून राज्यपाल त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यापासून रोखू शकत नाहीत.” आपल्या मागणीला बळकटी देण्यासाठी त्यांनी भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे उदाहरण दिले:
१. १९८९ चा काळ: त्यावेळी काँग्रेस १९४ जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. राष्ट्रपतींनी नियमानुसार आधी राजीव गांधींना निमंत्रण दिले होते. २. १९९६ चा काळ: अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नसतानाही तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले होते. जरी ते सरकार १३ दिवस टिकले, तरी लोकशाही परंपरेनुसार मोठ्या पक्षाला संधी देणे गरजेचे असते.
काय आहे नेमका आकड्यांचा खेळ? तमिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे सध्या १०८ जागा आहेत. सत्तास्थापनेसाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांनी १०७ (स्वतःची एक जागा कमी धरून) आणि काँग्रेसच्या ५ आमदारांसह एकूण ११३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. मात्र, राज्यपाल आर. एन. रवी यांनी ११८ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर करण्याची अट घातली आहे.
डीएमके आणि एआयएडीएमकेची छुप्या हालचाली? एकीकडे विजय सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एआयएडीएमकेने सरकार स्थापन करावे आणि डीएमकेने त्यांना बाहेरून पाठिंबा द्यावा, अशा एका फॉर्म्युलावर पडद्यामागे चर्चा सुरू आहे.
आता राज्यपाल प्रकाश आंबेडकरांनी सुचवलेल्या ऐतिहासिक परंपरेचा विचार करतात की आकड्यांच्या अटीवर ठाम राहतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
