पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची बुधवारी मध्यरात्री अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कोलकाता येथील मध्यमग्राम परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? चंद्रनाथ रथ हे रात्री १०:३० च्या सुमारास आपल्या स्कॉर्पिओ गाडीने कोलकाताहून घरी परतत होते. त्यांच्यासोबत चालक आणि आणखी एक व्यक्ती होती. गाडी मध्यमग्रामजवळ आली असता, मागून आलेल्या एका संशयास्पद कारने त्यांचा रस्ता अडवला. काही कळण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गाडीवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. अंदाजे ६ ते १० राऊंड फायरिंग करण्यात आली, ज्यातील चार गोळ्या थेट चंद्रनाथ यांच्या छातीत आणि पोटात लागल्या. या भीषण हल्ल्यात चंद्रनाथ यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
शुभेंदू अधिकारींची संतप्त प्रतिक्रिया आपल्या विश्वासू सहकाऱ्याच्या हत्येनंतर शुभेंदू अधिकारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “ही एक पूर्वनियोजित हत्या असून बंगालला गुंडांच्या विळख्यातून मुक्त करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने या हत्येमागे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा (TMC) हात असल्याचा आरोप केला आहे.
आईचा काळजाला भिडणारा आक्रोश चंद्रनाथ यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वृद्ध आईने, हसिरानी रथ यांनी माध्यमांशी बोलताना आपला आक्रोश व्यक्त केला. “माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला असता तर इतकं दुःख झालं नसतं, पण ज्या प्रकारे त्याला मारण्यात आलं ते अत्यंत वेदनादायी आहे,” असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे, आपल्या मुलाच्या खुन्यांना फाशी नको तर जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे, जेणेकरून त्यांना आपल्या कृत्याचा आयुष्यभर पश्चात्ताप होईल.
सध्या बंगाल पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून, हत्येसाठी वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. मात्र, त्या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले असून, हे काम एखाद्या प्रोफेशनल किलरचे असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
