मुंबई: बॉलिवूडचा दबंग खान, सलमान खान याच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’वर झालेल्या गोळीबार प्रकरणानं संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या वैयक्तिक अंगरक्षकाने (Bodyguard) विशेष न्यायालयात आपला साक्ष नोंदवली असून, त्या दिवशी पहाटे नक्की काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम त्याने उलगडला आहे.
पहाटे ४ चा तो थरार… बॉडीगार्डने दिलेल्या जबाबानुसार, १४ एप्रिल २०२४ ची ती पहाट नेहमीसारखी नव्हती. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा असतानाही, पहाटे साधारण ४ वाजेच्या सुमारास अचानक फटाके फुटल्यासारखा आवाज आला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या टीमला सुरुवातीला काही कळाले नाही, मात्र सीसीटीव्ही स्क्रीनवर पाहताच सर्वांचे धाबे दणाणले. हेल्मेट घातलेले दोन तरुण बाईकवरून आले होते आणि ते थेट सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडत होते.
“जीवे मारण्याचाच प्रयत्न होता” न्यायालयात साक्ष देताना बॉडीगार्डने स्पष्टपणे सांगितले की, “हल्लेखोरांनी ४ ते ५ राऊंड फायर केले. हा केवळ धमकावण्याचा प्रयत्न नव्हता, तर सलमान खानला जीवे मारण्याचाच हा थेट कट होता.” ज्यावेळी हा गोळीबार झाला, तेव्हा सलमान खान आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपलेला होता. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षारक्षक मुख्य दरवाजाच्या दिशेने धावले, पण तोपर्यंत हल्लेखोर वांद्रे बँडस्टँडच्या दिशेने पसार झाले होते.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचे कनेक्शन? गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा ‘Y+’ दर्जाची करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी न्यायालयात या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर केले आहेत. बॉडीगार्डची ही साक्ष या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, सलमानच्या चाहत्यांचे लक्ष आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
