एमआयडीसीचे पाणी अखेर पूर्ववत…

चार दिवस दिवस-रात्र काम करून जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावला.

Must read

हरचिरी येथून एमआयडीसी आणि मिऱ्या-शिरगावसह काही गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी टेंब्ये पूल येथे फुटल्याने तीन ते चार दिवस या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र ठेकेदार, एमआयडीसीचे कर्मचारी यांनी अहोरात्र काम करत फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यश मिळवले. पाण्याच्या दाबाने वारंवार जलवाहिनी फुटू नये, यासाठी काँक्रिटही टाकून ती मजबूत करण्यात आली. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत झाला. हरचिरी धरणातून एमआयडीसीसह मिऱ्या व शिरगाव, नाचणेसह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागील पाच-सहा दिवसांपासून टेंब्ये पूल येथे ही जलवाहिनी पाण्याच्या दबावामुळे वारंवार फुटत होती. नदी क्रॉसिंगजवळ फुटल्याने भरती-ओहोटीच्या वेळा पाहून ती दुरुस्त करावी लागत होती; मात्र ठेकेदाराने उपअभियंता बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस दिवस-रात्र काम करून जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावला.

नदीकिनारी फुटलेल्या ठिकाणी जीआय पाईपचा तुकडा काढून टाकून नवीन पॅच बसवला, तर टेंब्ये पूलच्या उतारामध्ये फुटलेल्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती करून, काँक्रिटने ती पॅकबंद करण्यात आली. त्यामुळे पाण्याच्या दबावाने पाईप फुटण्यास प्रतिबंध होणार आहे. शुक्रवारी चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ठेकेदार कंपनी व एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावत पाणी सुरू केले. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजकांसह मिऱ्या, शिरगाव, नाचणे भागातील ग्रामस्थांनी बी. एन. पाटील व या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आभार मानले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article