हृता दुर्गुळेच्या खऱ्या आयुष्यातील सासूची स्टार प्रवाहवर एन्ट्री; १३ वर्षांनंतर मुग्धा शाह साकारणार खलनायिका!

अमेरिका-इराण युद्धात आता डिजिटल संकट; समुद्राखालील इंटरनेट केबल्स ब्लॉक करण्याची इराणची धमकी, जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका.

Must read

मराठी मनोरंजन विश्वाची ‘क्रश’ आणि आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला आज कोण ओळखत नाही? नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून हृताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. वैयक्तिक आयुष्यात हृताने प्रसिद्ध हिंदी सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक प्रतीक शाह याच्याशी लग्नगाठ बांधली. हृताच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेतच, पण आता तिच्या कुटुंबातील आणखी एक मोठी आणि अनुभवी व्यक्ती टीव्ही स्क्रीनवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हृताची खऱ्या आयुष्यातील सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री मुग्धा शाह आहेत.

विशेष म्हणजे, हृता आणि तिचे पती प्रतीक शाह यांची पहिली भेट मुग्धा शाह यांच्यामुळेच झाली होती. हृताची पहिली लोकप्रिय मालिका ‘दुर्वा’मध्ये मुग्धा शाह यांनी तिच्या ऑनस्क्रीन सासूची भूमिका साकारली होती. आता तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मुग्धा शाह पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात कमबॅक करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आनंदी’मध्ये त्या एका महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत.

१३ वर्षांनंतर पुन्हा एकदा खलनायिकेचा दरारा!

अभिनेत्री मुग्धा शाह यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत जवळपास ८०% भूमिका या खलनायिकेच्या (Negative Roles) साकारल्या आहेत. ‘आनंदी’ या मालिकेत त्या ‘शिल्पा निंबाळकर’ हे नकारात्मक पात्र साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या मालिकेने अतिशय कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आता मुग्धा शाह यांच्या येण्याने मालिकेत नवीन वादळ आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

मालिकेत सध्या युगंधर आणि आनंदीचा विवाह तर पार पडला आहे, पण आनंदीला सून म्हणून अजून हक्काचा गृहप्रवेश मिळालेला नाही. अशातच शिल्पा निंबाळकरच्या एन्ट्रीमुळे आनंदीच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

असे असेल ‘शिल्पा निंबाळकर’चे पात्र:

आपल्या या पुनरागमनाबद्दल आणि भूमिकेबद्दल बोलताना मुग्धा शाह म्हणाल्या, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक भूमिका केल्या आहेत. ‘आनंदी’ मालिकेतील शिल्पा निंबाळकर हे पात्र अत्यंत कडक आणि जरब असणारे आहे. शिल्पा ही मुख्य नायक युगंधरची मोठी बहीण आहे. तिने एकेकाळी प्रेमासाठी एका गरीब मुलाशी लग्न केले होते, पण लग्नानंतर अपत्य न झाल्याने तिच्या पतीने तिला सोडून दिले. या वेदनादायी आणि कटू अनुभवामुळे शिल्पाच्या मनात गरीब लोकांबद्दल प्रचंड द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला आहे. गरीब लोक केवळ पैशासाठी श्रीमंतांचा वापर करतात, असा तिचा ठाम समज आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “जरी ती स्वभावाने कठोर असली, तरी तिचे आपल्या भावावर म्हणजेच युगंधरवर जीवापाड प्रेम आहे. भावासाठी ती काहीही करू शकते. अशा परिस्थितीत जेव्हा शिल्पाला युगंधर आणि आनंदीच्या लग्नाविषयी समजेल, तेव्हा मालिकेत एक वेगळंच हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”

मुग्धा शाह यांच्या या दमदार एन्ट्रीमुळे ‘आनंदी’ मालिकेतील उत्कंठा कमालीची वाढली असून, आता आनंदी या नव्या सासरच्या वादळाला कशी सामोरी जाणार, हे पाहणे रंजक ठरेल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article