IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सचे ४८ कोटी पाण्यात? ऋषभ पंत आणि निकोलस पूरनच्या फ्लॉप शोमुळे संघ संकटात!
लखनौ: आयपीएल २०२६ चा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे, पण लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) गोटात सध्या चिंतेचे ढग दाटले आहेत. ज्या खेळाडूंवर संघाने पैशांचा पाऊस पाडला, तेच मैदानावर अपयशी ठरताना दिसत आहेत. या मोसमात लखनौने खेळलेल्या ७ पैकी तब्बल ५ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाचे दोन सर्वात महागडे खेळाडू – कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार निकोलस पूरन यांचा अत्यंत सुमार फॉर्म.
पैशांचा पाऊस, पण धावांचा दुष्काळ! लखनौ संघाने लिलावात आपल्या १२० कोटींच्या एकूण बजेटपैकी तब्बल ४०% हिस्सा, म्हणजेच ४८ कोटी रुपये केवळ या दोन खेळाडूंवर खर्च केले होते. मात्र, मैदानावरील त्यांची कामगिरी पाहता हे कोट्यवधी रुपये वाया जाताना दिसत आहेत.
१. ऋषभ पंत: कर्णधारच गोंधळलेला! २७ कोटींची मोठी किंमत मिळालेला ऋषभ पंत या मोसमात पूर्णपणे लय गमावून बसल्याचे दिसतेय. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर (डक) बाद झाला. संपूर्ण हंगामात त्याचा स्ट्राईक रेट केवळ १३२ राहिला आहे, जो टी-२० क्रिकेटच्या दृष्टीने खूपच कमी आहे. माजी क्रिकेटपटूंच्या मते, पंत फलंदाजी करताना मानसिक आणि तांत्रिक गोंधळात अडकलेला दिसत आहे. हैदराबाद विरुद्धच्या एका सामन्यात तर त्याने ५० चेंडूत ६८ धावांची अतिशय संथ खेळी केली, ज्यामुळे जो विजय सहज मिळायला हवा होता, त्यासाठी संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले.
२. निकोलस पूरन: ‘फिनिशर’ ठरला ‘फ्लॉप’! गेल्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या निकोलस पूरनला संघाने २१ कोटींना खरेदी केले होते. पण या ७ सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ ७३ धावा निघाल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट तर ८२.०२ पर्यंत खाली घसरला आहे. पूरनच्या या फ्लॉप शोमुळे संघाचे फलंदाजीचे गणितच बिघडले आहे. त्याला संघात टिकवून ठेवण्यासाठी मॅनेजमेंटला एडन मार्कराम सारख्या तगड्या सलामीवीराला मधल्या फळीत खेळवावे लागत आहे, ज्याचा फटका पूर्ण संघाला बसतोय.
लखनौच्या संघात सध्या डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्कल यांसारखे दिग्गज मार्गदर्शक असले, तरी पूरन आणि पंतच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर या दोन्ही स्टार खेळाडूंनी लवकर फॉर्म पकडला नाही, तर लखनौचे प्ले-ऑफचे स्वप्न यावर्षी अधुरेच राहण्याची शक्यता आहे.



