माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन

विराट कोहलीचा सहकारी आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज अमनप्रीत सिंगने वयाच्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Must read

भारतीय क्रिकेट विश्वातून एक अत्यंत चटका लावणारी बातमी समोर आली आहे. पंजाबचा माजी वेगवान गोलंदाज आणि विराट कोहलीचा १९ वर्षांखालील (Under-19) संघातील सहकारी अमनप्रीत सिंग गिल यांचे चंदीगडमध्ये निधन झाले. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी अमनप्रीत यांनी जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मैदानावरील कारकीर्द आणि विराट-युवराजशी नाते: अमनप्रीत सिंग गिल हे पंजाब क्रिकेटमधील एक हुशार व्यक्तिमत्व होते. २००७ मध्ये त्यांनी भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. याच काळात ते टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत मैदानावर उतरले होते. इतकेच नाही तर आयपीएलच्या (IPL) पहिल्या हंगामात ते ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ (आताचा पंजाब किंग्स) संघाचे महत्त्वाचे सदस्य होते.

युवराज सिंगने व्यक्त केल्या भावना: माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अमनप्रीत यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ट्विटरवर (X) पोस्ट करत युवराज म्हणाला, “अमनप्रीतच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सुरुवातीच्या काळात आम्ही ड्रेसिंग रूम शेअर केली होती. तो एक अत्यंत शांत, कष्टाळू आणि खेळावर नितांत प्रेम करणारा खेळाडू होता. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे.”

निवड समिती सदस्य म्हणून योगदान: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अमनप्रीत खेळाशी जोडलेले राहिले. त्यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (PCA) वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब किंग्स संघाने त्यांना सोशल मीडियाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

केवळ ३६ व्या वर्षी एका उमद्या खेळाडूचा असा अकाली अंत होणे, हे भारतीय क्रिकेटसाठी मोठे नुकसान मानले जात आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article