स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आनंदी’ सध्या एका रंजक वळणावर आली आहे. पण आता या मालिकेत असा काही बदल घडणार आहे, ज्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल. गेली अनेक वर्षे आपल्या सोज्वळ आणि सकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता विकास पाटील तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मात्र, यावेळी तो ‘हिरो’ म्हणून नाही, तर एका भयानक ‘खलनायकाच्या’ रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
कोण आहे हा विद्याधर? विकास पाटील या मालिकेत ‘विद्याधर निंबाळकर’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. विद्याधर हा मुख्य पात्र युगंधरचा धाकटा भाऊ. युगंधरने स्वतःचे शिक्षण बाजूला ठेवून, अपार कष्ट करून विद्याधरला शिकवले आणि मोठे केले. मात्र, विद्याधरने भावाच्या कष्टांची कदर करण्याऐवजी त्याच्याच संपत्तीवर डोळा ठेवला आहे. विद्याधर हा अत्यंत उर्मट, अहंकारी आणि व्यसनी प्रवृत्तीचा दाखवण्यात आला आहे. ‘बाई आणि बाटली’च्या नादात तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा त्याचा दरारा असेल.
आनंदीच्या लग्नात मिठाचा खडा! मालिकेत सध्या आनंदीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच विद्याधरची एन्ट्री होणार आहे. आनंदीचे लग्न मोडण्यासाठी तो कोणती नवी चाल खेळणार आणि कुटुंबात कशी खळबळ माजवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना विकास म्हणाला की, “आजवर मी नेहमीच सकारात्मक भूमिका केल्या, पण विद्याधर ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी एक मोठे आव्हान आहे. त्याचा राग आणि अहंकार टोकाचा आहे, जो साकारताना मला एक अभिनेता म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे.”
विकास पाटीलसोबतच अभिनेता अमर जाधव देखील या मालिकेत ‘अभय’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या दोन नव्या पात्रांच्या येण्याने ‘आनंदी’ मालिकेचे कथानक आता अधिकच उत्कंठावर्धक होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, आनंदीचा हा नवा संघर्ष फक्त स्टार प्रवाहवर!
