२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला स्वामी भक्तीच्या रंगात रंगवले होते. आता तब्बल ११ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘देऊळ बंद २: आता परीक्षा देवाची’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात मोठ्या थाटामाटात लाँच करण्यात आला.
भक्तांची मांदियाळी आणि भावूक क्षण: अक्कलकोटमधील या सोहळ्याला चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. आपल्या लाडक्या कलाकारांना आणि स्वामींच्या महिमेवर आधारित चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी स्वामी भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. यावेळी चित्रपटाविषयी बोलताना प्रवीण तरडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांना आपले अश्रू अनावर झाले.
हा चित्रपट आहे ‘तिच्या’ कष्टाला समर्पित: स्नेहल तरडे अत्यंत भावूक स्वरात म्हणाल्या, “हा चित्रपट आम्ही अशा स्त्रियांना समर्पित करत आहोत, ज्या आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट सोसतात. त्यांच्या कामाची कुणी दखल घेवो वा न घेवो, त्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाबाळांच्या उत्कर्षासाठी लढत राहतात. स्वामींनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली, हीच आमच्यासाठी मोठी शक्ती आहे.”
काय असेल खास? पहिल्या भागात आपण पाहिले की, परदेशातून आलेला एक शास्त्रज्ञ स्वामींच्या गाडीतून प्रवास करतो. मात्र, ‘देऊळ बंद २’ मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या साध्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत. एका सामान्य कुटुंबाची ही असामान्य गोष्ट २१ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
