नेमकं काय घडलं होतं? कनिकाने जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ही घटना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घडली होती. लहानपणी दरवर्षीप्रमाणे ती आपल्या आजोळी सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असताना, तिच्या एका मोठ्या चुलत भावाने तिच्याशी गैरवर्तन केले. कनिका म्हणते, “त्यावेळी माझं वय खूप कमी होतं. नक्की काय घडतंय हे समजण्याइतपत मी मोठी नव्हते, पण काहीतरी चुकीचं होतंय, याची जाणीव मला आतून होत होती.”
भीतीपोटी अनेक वर्षे राहिली गप्प अनेक मुलांप्रमाणेच कनिकानेही हा धक्कादायक प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, “लहान मुलांसाठी अशा गोष्टी कोणाला सांगणं खूप कठीण असतं. मनात भीती असते की घरचे आपल्यावर विश्वास ठेवतील का? की आपल्यालाच ओरडतील? याच भीतीपोटी मी अनेक वर्षे हा कटू अनुभव मनात दाबून ठेवला.”
पालकांसाठी दिला महत्त्वाचा सल्ला आज इतक्या वर्षांनंतर या विषयावर उघडपणे बोलण्याचे धाडस तिने दाखवले आहे. या माध्यमातून तिने पालकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण द्यायला हवं, जेणेकरून त्यांच्यासोबत असं काही घडलं तर ते न घाबरता घरी सांगू शकतील,” असे कनिकाने आवर्जून नमूद केले.
कनिकाच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे. अशा संवेदनशील विषयावर बोलून तिने अनेकांसाठी प्रेरणा दिली असल्याची भावना तिचे चाहते व्यक्त करत आहेत.
