कोल्हापुरात जावयाला दीड किलो चांदीची चप्पल भेट; अधिक मासातील ‘या’ अनोख्या वाणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

वाण असावे तर असे! सोन्या-चांदीचे दर वाढले तरी हौशी सासऱ्याने जावबाच्या कोडकौतुकासाठी खर्च केले साडेचार लाख रुपये; कोल्हापुरी कारागिरीचा उत्कृष्ट नमुना.

Must read

कोल्हापूर: “हौसेला मोल नसते” आणि त्यातही विषय जर कोल्हापूरकरांच्या आदरातिथ्याचा असेल, तर मग काय विचारायलाच नको! सध्या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या असतानाही, कोल्हापुरातील एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयावरील प्रेमापोटी सर्व आर्थिक गणितं बाजूला सारली आहेत. पवित्र अधिक महिन्याचे (ज्याला ग्रामीण भागात ‘धोंड्याचा महिना’ म्हटले जाते) औचित्य साधून या वधूपित्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या लाडक्या जावयाला चक्क दीड किलो शुद्ध चांदीची कोल्हापुरी चप्पल वाण म्हणून भेट दिली आहे. या अनोख्या आणि आलिशान चपलेची किंमत मजुरीसह तब्बल ४.५ लाख रुपयांच्या घरात आहे.

हिंदू धर्मात अधिक महिन्यात जावयाला ‘धोंडे’ किंवा विशेष वाण देऊन त्याचा मानपान करण्याची जुनी परंपरा आहे. बदलत्या काळात या परंपरेला आधुनिक आणि भव्य स्वरूप आले आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावरील एका प्रतिष्ठीत कुटुंबात ही अनोखी कल्पना सुचली. आपल्या लेकीच्या नवऱ्याला, म्हणजेच जावयाला परदेशात असतानाही आपल्या मातीची आणि कोल्हापूरच्या संस्कृतीची कायम आठवण राहावी, या उदात्त हेतूने ही खास चांदीची चप्पल बनवून घेण्याचे ठरले.

८ ते ९ दिवसांची अथक मेहनत अन् अस्सल कारागिरी

ही हुबेहूब पारंपरिक लेदरच्या चपलेसारखी दिसणारी चांदीची चप्पल तयार करणे सोपे नव्हते. कोल्हापूरच्या चांदी बाजारपेठेतील प्रसिद्ध कारागीर विक्रांत माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सलग ८ ते ९ दिवस दिवस-रात्र मेहनत घेऊन हा कलाविष्कार साकारला आहे. ९५ टक्के शुद्ध चांदीमध्ये काही प्रमाणात कॅडमियम मिसळून या चपलेची मजबुती वाढवण्यात आली आहे. कोल्हापुरी चपलेचे मुख्य वैशिष्ट्य असलेले तिचे विविध भाग— जसे की वेणी, अंगठा, गोंडा, देथा, करंगळी आणि खालचा सोल— हे सर्व भाग चांदीमध्ये स्वतंत्रपणे तयार करण्यात आले आणि नंतर ते अत्यंत कुशलतेने एकत्र जोडण्यात आले. या उत्कृष्ट घडणावळीसाठी सुमारे २२ हजार रुपये फक्त मजुरी देण्यात आली आहे.

या चांदीच्या चपलेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात या “शाही” वाणाची आणि कोल्हापुरी थाटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article