नवी दिल्ली: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सध्या मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. याच स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी बेंगळुरूस्थित स्टार्टअप ‘ओबेन इलेक्ट्रिक’ने (Oben Electric) आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल ‘रोर इवो’ (Oben Rorr Evo) भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी कंपनीने ही बाईक अवघ्या ९९,९९९ रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) आकर्षक किमतीत उपलब्ध करून दिली आहे.
काय आहे खास? ओबेन रोर इवो ही बाईक रोर EZ आणि रोर EZ सिग्मा यांच्या दरम्यानच्या श्रेणीत येते. ही बाईक केवळ दिसायलाच स्टायलिश नाही, तर तिचे फीचर्सही ग्राहकांना आकर्षित करणारे आहेत. चला तर जाणून घेऊया या बाईकची सविस्तर वैशिष्ट्ये:
१. दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग: या बाईकमध्ये ३.४ kWh क्षमतेची LFP (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी वापरण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल १८० किमीची रेंज (IDC) देते. महत्त्वाचे म्हणजे, फास्ट चार्जरच्या मदतीने ही बाईक केवळ ९० मिनिटांत ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते.
२. ताकद आणि परफॉर्मन्स: रोर इवोमध्ये ९kW ची मोटर असून ती २५०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड ताशी ११० किमी असून, ही बाईक केवळ ३ सेकंदात ० ते ४० किमीचा वेग पकडू शकते. तसेच यात इको, सिटी, हॅवक आणि स्मार्ट आयक्यू असे चार रायडिंग मोड्स दिले आहेत.
३. हायटेक फीचर्स आणि डिझाइन:
-
डिस्प्ले: ५-इंचचा TFT कन्सोल जो स्मार्टफोनशी कनेक्ट होतो. यात नेव्हिगेशन, कॉल आणि मेसेज अलर्ट मिळतात.
-
सुरक्षा: चोरी रोखण्यासाठी अँटी-थेफ्ट अलर्ट, जिओ-फेन्सिंग आणि फॉल अलर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.
-
स्टोरेज: टाकीच्या जागी ४ लिटर आणि सीटखाली ६ लिटरची जागा सामानासाठी दिली आहे.
ही बाईक न्यूट्रॉन ब्लू, पल्स रेड, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट अशा चार आकर्षक रंगात उपलब्ध आहे. या बाईकची थेट स्पर्धा ओला रोडस्टर X (Ola Roadster X) शी असणार आहे. अवघ्या ७७७ रुपयांत तुम्ही या बाईकचे बुकिंग करू शकता.
