स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. विशेषतः मालिकेतील खलनायिका ‘प्रिया’ हिचा खोटा बुरखा आता सर्वांसमोर फाटला आहे. एकामागून एक तिची सगळी कारस्थानं उघड होत असल्यामुळे, “आता प्रियाचा खेळ संपला का?” आणि “ती मालिकेतून बाहेर पडणार का?” अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं.
अखेर या सर्व अफवांवर खुद्द प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने मौन सोडलं आहे. तिने प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणाली प्रियांका तेंडोलकर? एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने स्पष्ट केलं की, प्रियाचं पात्र मालिकेतून इतक्यात संपणार नाहीये. प्रियांका म्हणाली, “प्रियाचा ट्रॅक सध्या रंजक वळणावर आहे. तिने केलेली पापं आता उघड झाली आहेत, त्यामुळे तिला शिक्षा तर होणारच! पण ती मालिकेतून पूर्णपणे गायब होणार नाही. ती आजही अश्विन सुभेदारची पत्नी आहे, त्यामुळे तिचं स्थान मालिकेत टिकून आहे. शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं आणि ती पुन्हा कोणती चाल खेळते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल.”
कठोर मेहनतीचा प्रवास गेल्या काही आठवड्यांपासून प्रियाच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. हे शूटिंग करण्यासाठी प्रियांकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. ३५-३५ पानांचे सीन्स आणि सलग कित्येक तास चाललेलं चित्रीकरण यामुळे ती शारीरिकदृष्ट्या थकली होती, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून तिला कामाचं समाधान मिळालं आहे. विशेष म्हणजे, प्रियाचं पितळ उघडं पडल्यानंतर तिला पडद्यावर अनेक पात्रांकडून ‘थोबाडीत’ खावी लागली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.
थोडक्यात सांगायचं तर, प्रियाला तिच्या कर्माची फळं मिळणार असली, तरी प्रियांका तेंडोलकर ही मालिका सोडून जात नाहीये. उलट, आगामी भागात ती नवीन रूपाने किंवा नव्या कारस्थानासह प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.
