वरळीत ट्रॅफिकचा ‘आक्रोश’: गिरीश महाजनांना झापणाऱ्या ‘त्या’ महिलेविरोधात सदावर्तेंच्या लेकीची पोलिसांत धाव!
मुंबई: सध्या मुंबईतील वरळी परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निमित्त ठरलं ते भाजपचा ‘जनआक्रोश मोर्चा’ आणि त्या दरम्यान निर्माण झालेली प्रचंड वाहतूक कोंडी. पण या सगळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे ती एक सामान्य महिला, जिने थेट कॅमेऱ्यासमोर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं असून, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने वरळीतील जांबोरी मैदान परिसरात एका भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात हजारो महिला आणि भाजपचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी हा मोर्चा रस्त्यावर आल्याने वरळी आणि आसपासच्या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मुंबईकरांचा संयम सुटला.
अशातच एक महिला आपल्या गाडीतून खाली उतरली आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या दिशेने धाव घेतली. “तुमच्या राजकारणामुळे आम्हाला का वेठीस धरता? आंदोलन करायचे तर मैदानात करा, रस्ते का अडवता?” अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि ‘सामान्यांचा आवाज’ म्हणून अनेकांनी तिचे कौतुक केले.
झेन सदावर्ते यांची तक्रार का? दुसरीकडे, झेन सदावर्ते यांनी या महिलेची वागणूक चुकीची असल्याचे म्हटले आहे. झेनच्या मते, “संबंधित महिलेने केवळ मंत्र्यांशीच नव्हे तर तिथल्या महिला कार्यकर्त्यांशीही उद्धटपणे वर्तन केले. संताप व्यक्त करण्याला कोणाची हरकत नाही, पण ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी गोंधळ घातला, ते कायदेशीररित्या चुकीचे आहे.” याच कारणावरून झेनने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत त्या महिलेविरोधात तक्रार नोंदवली आहे.
एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी “तिचा राग मी समजू शकतो, पण तिची भाषा चुकीची होती,” असे सांगत संयमी भूमिका घेतली असतानाच, झेन सदावर्तेंच्या या तक्रारीमुळे हे प्रकरण आता कायदेशीर वादात अडकण्याची शक्यता आहे.
